जनगणनेत ओबीसींच्या वेगळ्या कॉलमच्या समावेशासाठी १५ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन

सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक.विजय वडेट्टीवारांचा ओबीसींच्या प्रश्नांवर लढ्याचा एल्गार

१८ ओबीसी संघटनांचा वडेट्टीवारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय ओबीसी न्याय मोर्चा

नागपूर, दि. ११- जनगणनेत ओबीसीं वेगळा कॉलमचा समावेश व्हावा, या मागणीसाठी येत्या १५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत आंदोलन करण्याची आणि २ नोव्हेंबर रोजी भारत बंदची घोषणा ओबीसी नेते आणि काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने देशभरातील १८ राज्यातील विविध ओबीसी संघटनांची राष्ट्रीय रणनीती बैठक रविवारी नागपूर येथे हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी नागपूर घोषणापत्र जाहीर करीत आंदोलनाच्या कार्यक्रमाची घोषणा केली. या बैठकीत नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे नेतृत्व विजय वडेट्टीवार करतील, असे १८ राज्यातील प्रतिनिधींनी एकमताने ठरविले. या संघटनेची समन्वय समिती लवकरच स्थापन केली जाईल व तिची बैठक हैद्राबाद किंवा बंगलुरू येथे घेण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.

जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समावेश व्हावा म्हणून १२ ते १८ ऑक्टोबर या काळात ओबीसी न्याय मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आपापल्या राज्यातील खासदार व आमदार यांना भेटून ओबीसींचा समावेश जनगणनेत करण्याच्या मागणीला पाठिंबा मागतील. ही मागणी त्यांनी संसद व विधीमंडळात लावून धरावी, अशी विनंती करतील.यानंतर १५ ऑक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना या मागणीसाठी निवेदन दिले जाईल. २५ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून २ नोव्हेंबरला या मागणीसाठी भारत बंद आंदोलन केले जाईल. तसेच १५ नोव्हेबरला दिल्लीत आंदोलन केले जाईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ना हिंदू खतरे मे है, ना मुस्लिम खतरे मे है.. चलो दिल्ली अब ओबीसी खतरे मे है, अशी घोषणा देत देशभरातील ओबीसी हजारोंच्या संख्येने १५ नोव्हेंबरला दिल्लीत दाखल होतील, असे त्यांनी जाहीर केले.

सकल ओबीसी महामोर्चातर्फे आयोजित या परिषदेत काश्मीर ते केरळ अशा १८ राज्यातील १५० हून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. सकल ओबीसी मोर्चाचे संयोजक उमेश कोर्राम यांनी या एक दिवसीय परिषदेचे संचालन केले.

अ.भा. ओबीसी महासभेच्या कोअर कमिटीचे सदस्य धर्मेंद्र कुशवाह, तेलंगणातील माजी मंत्री बी.श्रीनिवास गौडा, अ.भा. काँग्रेसचे सचिव जितेंद्र बघेल व सुहासिनी शरद यादव, ओबीसी प्रश्नांच्या अभ्यासिका व ज्येष्ठ नेत्या सुशीला मोराळे, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, क्रिमी लेअर प्रश्नी न्यायालयीन लढाई जिंकणारे वकिल शशांक रत्नू, तेलंगणातील ओबीसी विद्यार्थी संघटनेचे किरण कुमार व रजनीकांत गौडा, कर्नाटकातील ओबीसी फेडरेशनचे जे. एंजीरप्पा, मध्य प्रदेशातील ब्रजेश सिंग यादव, विभा पटेल आणि विद्या यादव, उत्तर प्रदेशातील मिथिलेश कुमार व सुनील वर्मा, जम्मू काश्मीरचे गुलाम हसन व धनराज चौधरी तसेच महाराष्ट्रातील अंजली साळवे, विलास काळे यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी दिवसभर चाललेल्या परिषदेत आपली मते व सूचना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकल ओबीसी महामोर्चा चे संयोजक, उमेश कोर्राम यांनी केले.

 

चौकट

वडेट्टीवारांच्या राष्ट्रीय ओबीसी नेतृत्वावर शिक्कामोर्तब

सकल ओबीसी महामोर्चातर्फे आयोजित या राष्ट्रीय ओबीसी रणनीती परिषदेस उपस्थित सर्वच नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करावे, असे सूचित केले. ओबीसी समाजाचे अभ्यासू व आक्रमक नेते दिवंगत शरद यादव यांच्या कन्या सुहासिनी यादव यांनी वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करावे, असा प्रस्ताव या परिषदेत मांडला. या प्रस्तावाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात एकमताने अनुमोदन दिले. केरळच्या रझिया बी यांनीही हीच भावना व्यक्त केली. काश्मीर ते केरळहून आलेल्या ओबीसी नेत्यांनी वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसींसाठी लढण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *