चंद्रपूर जिल्ह्यात ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान-२०२६’ला सुरुवात

१४ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी आरोग्य तपासणी; जिल्ह्यात १,५३७ पथके कार्यरत

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. २८ : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात दि. २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. समाजात निदान न झालेले संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांचे वेळीच निदान करणे आणि निदान झालेल्या रुग्णांवर तातडीने बहुविध औषधोपचार सुरू करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या संदर्भात आज (दि. 28) जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पराग जीवतोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन टेंभुर्णे उपस्थित होते

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामीण भागासह शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या पथकांमार्फत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची कुष्ठरोगाच्या दृष्टीने आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या संशयित व्यक्तींना पुढील तपासणीसाठी संदर्भित करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान निश्चित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १,५३७ पथकांची निर्मिती
कुष्ठरुग्ण शोध अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अभियानांतर्गत एकूण ४ लाख ४१ हजार ३६२ घरांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३ लाख ८६ हजार ८९०, शहरी भागातील २८ हजार ३७१ आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २६ हजार १०१ घरांचा समावेश आहे.
या सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात १,३८२ पथके, शहरी भागात ८० पथके आणि चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ७५ पथके, अशी एकूण १,५३७ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत निर्धारित कालावधीत घरोघरी भेट देऊन कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.

संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर
समाजात निदान न होता लपून राहिलेले कुष्ठरुग्ण शक्य तितक्या लवकर आणि कोणतीही विकृती निर्माण होण्यापूर्वी शोधणे, त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नवीन सांसर्गिक रुग्णांचे वेळीच निदान करून संसर्गाची साखळी खंडित करणे हा अभियानाचा उद्देश आहे. त्यासोबतच कुष्ठरोगाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. कुष्ठरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करत सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे, हा या मोहिमेमागील व्यापक उद्देश आहे.

‘ही’ लक्षणे आढळल्यास तपासणी आवश्यक
त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा असणे व त्या ठिकाणी घाम न येणे, त्वचा जाड, बधीर, तेलकट अथवा चकाकणारी दिसणे, त्वचेवर गाठी येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे बंद करता न येणे ही कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे आहेत. तसेच तळहात किंवा तळपायाला मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, त्वचेला थंड-गरम संवेदना जाणवू नये, हात-पायाच्या बोटांमध्ये वाकडेपणा येणे, हात किंवा पायात अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे किंवा चालताना पायातून चप्पल निसटणे अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

अभियानादरम्यान आरोग्य पथक घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीमध्ये कुष्ठरोगाची संशयित लक्षणे असल्यास ती न लपविता आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगावीत आणि आवश्यक तपासणी करून घ्यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान आणि नियमित बहुविध औषधोपचारामुळे रुग्णाला विकृतीपासून वाचविण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी कुष्ठरुग्ण शोध अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *