अंगणवाडी उत्सव व पोषण माहनिमित्त भद्रावतीत जनजागृती

‘सेवा संकल्प अभियान’ व ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम

चंद्रपूर , दि. 18 : महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासोबतच पोषण, आरोग्य, शिक्षण आणि मुलींच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सभागृह, भद्रावती येथे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सेवा संकल्प अभियान’, ‘अंगणवाडी उत्सव’ तसेच ‘पोषण अभियानांतर्गत पोषण माह’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम, प्रशिक्षक अभिषेक मोहुर्ले, धर्मेंद्र मेश्राम, प्रिया पिंपळशेंडे, विस्तार अधिकारी स्नेहल चार्लॅकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुलींचे शिक्षण व संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, मातृ व बाल आरोग्य, संतुलित आहार, कुपोषण प्रतिबंध, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील पोषणाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

अंगणवाडी केंद्र बालकांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी महिला व बालकांच्या विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. अंगणवाडी केंद्र हे केवळ पोषण आहार वितरणाचे केंद्र नसून बालकांचे आरोग्य, पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. माता व बालकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अंगणवाडी यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या विकासासाठी विविध विभागांनी समन्वयातून काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने लोकसहभाग वाढवावा आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार यांनी शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाची’ माहिती दिली. अंगणवाडी केंद्रांवर बालकांसोबत मातांनाही सहभागी करून महिलांचे आरोग्य, माता-बाल पोषण आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहितीही या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी बालकांच्या वाढीचे नियमित निरीक्षण, पोषण स्थितीचे परीक्षण, पालकांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच माता-बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृतीचे महत्त्व सांगितले. यावेळी पौष्टिक आहार प्रदर्शनी आणि जनजागृती रॅली
आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी स्नेहल चार्लॅकर यांनी केले. संचालन पर्यवेक्षिका विद्या श्रीरामे यांनी तर आभार कृतिका नैताम यांनी मानले. कार्यक्रमाला भद्रावती तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *