जिल्याात ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवा : जिल्हाधिका-यांच्या यंत्रणांना सुचना

चंद्रपूर, दि. 17 : विविध शासकीय योजना व सेवा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देऊन प्रलंबित कामांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातही हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी ‘सेवा संकल्प अभियान’ बाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

‘सेवा संकल्प अभियान’ मध्ये विविध विभागांचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, कृषी विभागाने यांत्रिकीकरण येाजनेंतर्गत अनुदान वाटप करावे तसेच शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावनिहाय बैठकांचे आयोजन करावे. आदिवासी विकास विभागाने सामूहिक वन हक्क बाबत तसेच पेसा अंतर्गत गावांच्या कार्यशाळा आयोजित कराव्यात. शिक्षण विभागाने 5 आणि 15 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करीता विशेष शिबिरांचे आयोजन करावे. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांकडून परसबागची निर्मिती करावी. तसेच शाळेतील एखाद्या संरक्षण भिंतीवर रंगरंगोटी करून छायाचित्रे काढण्यास प्रवृत्त करावे.

नागरिकांच्या दृष्टीने अभियानात विविध प्रमाणपत्रांचे वितरण, जन्म-मृत्यू नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, सातबारा व 8-अ नोंदी अद्ययावत करणे, प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, आरोग्य तपासणी, स्वच्छता व वृक्षारोपण, सायबर सुरक्षा जनजागृती, रोजगार व कौशल्यविषयक उपक्रम अशा सेवा देण्यावर भर आहे.
विविध विभागांचा सहभाग व उपक्रम : ‘सेवा संकल्प अभियान’ मध्ये महसूल, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, वन, कौशल्य व रोजगार, माहिती व जनसंपर्क आदी विभागांचा सहभाग आहे. अभियानात ‘सेवा सेतू’, ‘सेवा माझे योगदान’, ‘विकसित भारत’ चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ‘नमो सेवागाथा’, ‘सेवाज्योत यात्रा’, अंगणवाडी उत्सव, ‘बदलाची गोष्ट’, ‘जनसेवक महाकुंभ’ यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.

बैठकीला उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, नुतन सावंत, मिना साळूंके, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, मृद व जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *