स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांनी सतर्कतेने केली कारवाई

चंद्रपूर : स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याच्या तयारीत ही महिला असताना रामनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मुख्य आरोपी असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या पतीचा 4 वर्ष आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला 26 वर्षीय अजय फुलझेले या तरुणासोबत ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होती. अजय फुलझेले पासून झालेल्या दोन बाळांची या महिलेने जून 2024 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तेलंगानाच्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील एका महिलेला अंदाजे चार ते पाच लाख रुपयांमध्ये विक्री केली.

याच दरम्यान आरोपी प्रियकर अजय फुलझेले याने मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणाचा रामनगर पोलिसांना सुगावा लागल्याने त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला. पीडितेच्या जबाबावरून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेली 40 वर्षीय महिला आणि बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील दोन महिलांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामागे नवजात बाळांची विक्री करणारं रॅकेट सक्रिय आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *