प्रेमप्रकरणात अडसर ठरलेल्या बापाचा पोरीने काढला काटा, मिल्कशेकमधून दिले विष, पत्नीशी विसंवाद झाल्यावर 3 वर्षानंतर जावयाने पोलिसात दिली तक्रार, धक्कादायक प्रकरणाने पोलिसही चक्रावले
चंद्रपूरात पोलीस कॉन्स्टेबलचा त्याच्याच मुलीने विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यूनंतर तब्बल ३ वर्षांनी या प्रकरणाचा खुलासा झालाय. मयत पोलीस कर्मचाऱ्याची आरोपी मुलगी देखील चंद्रपूर पोलीस विभागात कॉन्स्टेबल असून आरोपी जावयाला पोलीस ट्रेनिंग दरम्यान करण्यात सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मयत पोलीस कर्मचाऱ्याचा मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने मुलीने विष देऊन पित्याची हत्या केली.
२५ एप्रिल २०२३ ला जयंत बल्लावार (४५) यांचा ड्युटीवर असतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. मात्र तेव्हा पोलिसांनी केवळ मर्ग दाखल केला. मात्र ३ दिवसांपूर्वी मृतकाचा जावई आशिष शेडमाके याने पोलीसात आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली देत आपली पत्नी आर्या बल्लावार हिने वडिलांना विष देऊन मारल्याची माहिती दिली.मयत जयंत बाल्लावार यांना ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्याने मिल्कशेक मध्ये विष टाकून पिण्यासाठी दिले. मिल्कशेक पिल्यावर जयंत बल्लावार हे ड्युटी वर प्रशासकीय भवन मध्ये गेले असता त्यांचा मृत्यू झाला. २०२२ पासून प्रेमसंबंधात असलेल्या आर्या आणि आशिष यांच्या प्रेमाला जयंत बल्लावार यांचा विरोध होता.
त्यामुळे आर्याने आपला मावसभाऊ चैतन्य गेडाम (२२) याच्याकडून ५ हजार रुपयांना विष विकत घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यातच बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाके ला ट्रेनिंग दरम्यान बडतर्फ करण्यात आले. तर ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर आर्या बाल्लावार सासरी न येता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिष शेडमाके ने पूर्ण प्रकार उघडकीस आणला. रामनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिला पोलीस अंमलदार आर्या बाल्लावार सह नवरा आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष विकत देणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उघडकीस आलेल्या या प्रकरणाने खुद्द पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे.
