सागवान वस्तूंच्या फिरत्या विक्री केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

माविम व एफडीसीएमचा संयुक्त उपक्रम

महिला सक्षमीकरणासह स्थानिक रोजगाराला चालना

चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सागवान वनसंपदा आणि महिलांचे कौशल्य यांची सांगड घालून महिलांना रोजगार व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने सागवान लाकडापासून निर्मित विविध वस्तूंचे फिरते विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्य भारती, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहायक विभागीय व्यवस्थापक रुपेश पाटील, वन संरक्षण अधिकारी संभाजी कोंडेवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, जिल्हा प्रकल्प सल्लागार भूषण मुंजेकर, नरेंद्र बनकर, अमित चवरे, खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे, व्यवस्थापक शारदा हुसे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दर्जेदार सागवानाची ओळख अधिक व्यापक करणे आणि त्याचवेळी महिलांना रोजगार व विपणनाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या अभिनव उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील वनसंपदेचा योग्य वापर करून महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न माविम आणि एफडीसीएमच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या फिरत्या विक्री केंद्रात सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक मूर्ती, विविध प्रकारचे फर्निचर, खुर्च्या, टेबल, दरवाजे, कटिंग बोर्ड, मोमेंटो, नेमप्लेट, शोभेच्या वस्तू तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उत्तम दर्जाचे सागवान लाकूड, आकर्षक डिझाईन आणि महिलांच्या कौशल्यातून साकारलेल्या कलाकुसरीमुळे या उत्पादनांना विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.

या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळण्यासोबतच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या लघुउद्योगांना चालना मिळणार आहे. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार सागवान लाकडापासून तयार केलेल्या दर्जेदार वस्तू खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उत्पादनांबाबत अधिक माहितीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित खुशिया लोकसंचालित साधन केंद्र, चंद्रपूर येथे संपर्क साधता येईल.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *